• 3 years ago
धुळवडीला मित्रांनी रंग लावू नये, म्हणून इमारतीच्या गच्चीवर जाऊन लपलेल्या एका तरुणाचा खाली पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये घडली. शिवाजीनगर परिसरात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. धुळवडीच्या दिवशी सूरज आणि भाऊ तुषार मोरे दुपारी मित्र अविनाश पाटील याला भेटण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्याच परिसरातले इतर काही मित्र तिथून जात असताना त्यांना सूरज आणि तुषार दिसले. मित्रांनी रंग लावू नये यासाठी सूरज आणि तुषार हे दोघेही तेथील इमारतीत पळाले. तुषार हा पहिल्या मजल्यावर तर सूरज हा थेट गच्चीवर जाऊन लपला. यावेळी तुषारला मित्रांनी पकडून आणले, तर सूरज हा गच्चीतून खाली पडला. इमारतीच्या टेरेसवर असलेल्या डक्टमधून सूरज खाली पडल्याने त्याच्या पायाला दुखापत झाली. यानंतर त्याच्या भावाने आणि मित्रांनी त्याला अंबरनाथच्या एका खासगी रुग्णालयात नेले. मात्र दुपारी साडेतीनच्या सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

Category

🗞
News

Recommended